Ayushman Vay Vandana Card : यंदाच्या दिवाळीला केंद्र सरकारने देशातील वृद्ध नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं असून ७० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वयोवृद्ध नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्यास सुरुवात केली.
यासाठी मात्र ७० वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ बनवावे लागणार आहे. हे कार्ड बनवल्यानंतरच ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून यासाठी Ayushman Vay Vandana Card कार्ड काढण्याची प्रक्रिया माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
७० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व वृद्ध नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय आयुष्मान भारत योजनेचा लाभ त्यांच्या कुटुंबात आधीच मिळत असल्यावर सुद्धा कुटुंबातील ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृद्धांना ५ लाख रुपयांचे वेगळे कव्हरेज दिले जाईल.
सरकारी कर्मचाऱ्यांचं काय?
केंद्र अथवा राज्य सरकारच्या सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या ७० वर्षांपेक्षा वय असलेले ज्येष्ठ नागरिक किंवा आधीपासून कोणत्याही सरकारी आरोग्य विमा योजनेचा लाभ घेत असतील तर मात्र त्यांना दोनपैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल.
Ayushman Vay Vandana Card बनवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे
- आयुष्मान वय वंदन कार्ड बनवण्याकरिता सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://nha.gov.in/PM-JAY वर जावे लागेल.
- या वेबसाईटवर तुम्हाला PMJAY For 70+ चा पर्याय दिसेल. ज्यामध्ये Enrol या पर्यायावर क्लिक करा.
- अर्जदार जर स्वतः अर्ज करत असेल तर लाभार्थी या पर्यायाची निवड करुन विचारलेल्या सर्व माहितीसह लॉग इन करावा.
- जर परिवारातील कोणतीही व्यक्ती घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या नावाने अर्ज करत असेल तर त्यासाठी ऑपरेटर या पर्यायाची निवड करावी लागेल. यासाठी वृद्ध नागरिकांचे आधार कार्ड, रेशन कार्ड यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल. ई-केवायसी पूर्ण केल्यावरच आयुष्मान कार्ड डाउनलोड करता येते.
आयुष्मान ॲपद्वारे असा करा अर्ज
- तुमच्या मोबाईलद्वारेही आयुष्मान कार्ड मिळवता येते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आयुष्मान भारत अॅप डाउनलोड करावे लागेल.
- अॅप उघडल्यावर, भाषा यानंतर लाभार्थी अथवा ऑपरेटर या पर्यायाची निवड करून लॉग इन करा.
- आता फॅमिली आयडी, आधार कार्ड अशी माहिती टाका. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. आता तुम्हाला कार्ड डाउनलोड करता येईल.
Ayushman Vay Vandana Card चे फायदे
- मोफत उपचार : Ayushman Vay Vandana Card आरोग्यसेवा गरजांसाठी प्रति कुटुंब ₹ 5 लाख वार्षिक आरोग्य कवच प्रदान करते, जर एका घरात अनेक वृद्ध व्यक्ती राहत असतील तर सामायिक केल्या जातात.
- युनिव्हर्सल ऍप्लिकॅबिलिटी : उत्पन्नावर कोणतेही बंधन नाही, ज्यामुळे ते भारतातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले आहे.
- ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांना आर्थिक ताण कमी होईल.
- हे कार्ड सुमारे 4.5 कोटी कुटुंबांना लाभ देईल, ज्यामध्ये सुमारे 6 कोटी ज्येष्ठांना प्रति कुटुंब वार्षिक ₹5 लाख विमा संरक्षण मिळेल.
- इतर योजनांसोबत एकीकरण : इतर सरकारी आरोग्य योजनांचे लाभार्थी, जसे की CGHS आणि ECHS, त्यांचे सध्याचे कव्हरेज राखणे किंवा आयुष्मान भारत लाभांवर स्विच करणे निवडू शकतात.
- इतर लाभार्थ्यांसाठी : हे कार्ड कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत समाविष्ट असलेल्या व्यक्तींसाठी आणि खाजगी आरोग्य विमा असलेल्यांसाठी देखील उपलब्ध आहे.