गरीब आणि गरजूंसाठी उपचारात मदतीचा हात म्हणजे धर्मादाय रुग्णालय योजना – Dharmaday Yojana Maharashtra

Dharmaday Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील अनेक धर्मादाय रुग्णालये ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम ४१-क-क अंतर्गत कार्यरत आहेत. या अधिनियमाच्या नियमानुसार, या रुग्णालयांनी गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी काही खाटा सवलतीच्या दरात किंवा मोफत राखून ठेवणे बंधनकारक आहे.

राज्यातील गरीब आणि निर्धन नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमधील महागडे उपचार परवडत नाहीत यासाठी ते जीव महत्त्वाचा म्हणून वेळप्रसंगी शेती, घर किंवा इतर मालमत्ता विकून, वेळप्रसंगी कर्ज काढून उपचार घेतात, अशा रुग्णांना महाराष्ट्र सरकारची ‘धर्मादाय रुग्णालय योजना’ ही गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी एक मोठा दिलासा आहे.

महाराष्ट्रात एकूण ४३० धर्मादाय रुग्णालये आहेत. अनेक धर्मादाय रुग्णालये दिसायला पंचतारांकित असतात. या हॉस्पिटल्समध्ये उपचार महागडे असतील असे समजून गरीब मराठा बांधव तिकडे फिरकत नाहीत.

काय आहे धर्मादाय रुग्णालय योजना?

Dharmaday Yojana अंतर्गत, धर्मादाय रुग्णालयांमध्ये २०% खाटा गरिबांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील १०% खाटा अत्यंत गरजू रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत आहेत, तर उर्वरित १०% खाटा मध्यम आर्थिक परिस्थिती असलेल्या रुग्णांना अर्ध्या दरात उपचारासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे गरजूंना योग्य वैद्यकीय सेवा मिळवणं थोडं सोपं आणि परवडणारं झालं आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली असून, ती योजना दि. ०१/०९/२००६ पासून लागू करण्यात आली आहे. सदर योजनेची संपूर्ण माहिती
charity.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक: १८००२२२२७० हा आहे

कोणाला मिळेल या योजनेचा लाभ?

१) निर्धन वर्गातील लाभार्थी रुग्ण

ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ८५,००० किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा रुग्णांसाठी एकूण खाटांपैकी १०% खाटा १००% मोफत उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

२) दुर्बल घटकांतील लाभार्थी रुग्ण

ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. १,६०,००० किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा रुग्णांसाठी १०% खाटा ५०% सवलतीच्या दरात उपचारासाठी राखीव असतात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

उपरोक्त सुविधांचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

  • रेशन कार्ड
  • तहसीलदार यांच्याकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला
  • दारिद्र्यरेषेखालील (BPL) प्रमाणपत्र

वैद्यकीय लाभ कसा मिळवायचा?

  • रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवक यांच्याशी संपर्क साधावा.
  • आपली माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत सादर करून तपासणीसाठी द्यावी.
  • तातडीच्या परिस्थितीत रुग्णालयाने रुग्णाला त्वरित दाखल करून उपचार सुरू करणे गरजेचे आहे.
  • समाजसेवकांनी वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून, डॉक्टरांसोबत समन्वय साधावा.

उपचारात अडचण आल्यास काय करावे?

  1. धर्मादाय निरीक्षक किंवा स्थानिक धर्मादाय कार्यालयाशी संपर्क साधावा.
  2. आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडावे.
  3. टोल फ्री क्रमांक: १८००२२२२७०
  4. अधिकृत वेबसाइट: charity.maharashtra.gov.in

तक्रार निवारण प्रक्रिया

  • रुग्णांनी आपले लेखी मत धर्मादाय कार्यालयाकडे सादर करावे. 
  • त्यानंतर रुग्णालयाचे प्रतिनिधी आणि रुग्ण/नातेवाईक यांच्याकडून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून धर्मादाय आयुक्त अंतिम निर्णय देतात.

अतिरिक्त मदतीसाठी

  • आवश्यक असल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातील धर्मादाय निरीक्षकांशी संपर्क साधावा.
  • त्यांच्या मार्गदर्शनाने तपासणी करून मदत मिळवता येते.

अतिरिक्त सुविधा

  • charity.maharashtra.gov.in वर “बेड उपलब्धता पहा” या विभागात SMS/E-Mail च्या माध्यमातून रुग्णालयातील संपर्क व्यक्ती व खाटांची उपलब्धता पाहता येते.
  • काही सरकारी व महापालिका रुग्णालयांमध्ये Smart TV वरही धर्मादाय रुग्णालयातील खाटा व अन्य माहिती पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ही योजना गरीब आणि गरजूंना योग्य वेळी योग्य वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे गरजूंनी योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी वरील वेबसाइट किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यातील धर्मादाय हॉस्पिटलची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top