e-Gramswaraj App – ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाच्या प्रगतीचा पाया. भारत हा कृषीप्रधान देश असून, भारतातील मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते म्हणजेच मोठ्या लोकसंख्येचा आधार ग्रामीण भागावर निर्भर आहे. त्यामुळे गावांचा सर्वांगीण विकास करणे ही काळाची गरज आहे.
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला मिळणारा निधी महत्त्वाचा असतो. हा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत मिळतो. सध्या सुमारे 1140 योजना गावांच्या विकासासाठी उपलब्ध आहेत. मात्र, हा निधी कसा वापरला जातो आणि त्यातून नेमकी कोणती कामे होतात, याबद्दल अनेकांना स्पष्ट माहिती नसते.
भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून गावाच्या निधीचा वापर कसा होतो, कोठे होतो? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला, यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘ई-ग्रामस्वराज्य’ (e-Gramswaraj App) ॲपची माहिती घेऊ.
ग्रामपंचायतीकडून निधीची मागणी कशी केली जाते?
दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ग्रामविकास समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते इत्यादी विषयांवर चर्चा केली जाते. गावाच्या गरजेनुसार कोणत्या कामांसाठी किती निधीची आवश्यकता आहे, याचा अंदाज बांधला जातो.
नंतर या आवश्यकतांचा समावेश असलेले अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीकडे पाठवले जाते. पंचायत समिती ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवते. यानुसार, केंद्र, राज्य आणि इतर योजनांच्या माध्यमातून गावासाठी निधी मंजूर होतो.
15व्या वित्त आयोगानुसार, गावातील प्रत्येक व्यक्तीकरिता सरकार प्रतिवर्षी निधी देते. यापैकी 50% निधी स्वच्छता आणि पाणीपुरवठ्यासाठी, तर उर्वरित 50% इतर विकासकामांसाठी वापरला जातो.
ई-ग्रामस्वराज्य ॲप (e-Gramswaraj App) द्वारे ग्रामपंचायतीच्या निधीची माहिती कशी मिळवायची?
सरकारने ग्रामपंचायतींना दिलेला निधी आणि त्याचा उपयोग याबाबत माहिती मिळवण्यासाठी ‘ई-ग्रामस्वराज्य’ हे ॲप्लिकेशन खूप उपयुक्त आहे. यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करा:
- e-Gramswaraj App डाऊनलोड करा : तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘ई-ग्रामस्वराज्य’ ॲप डाउनलोड करा.
- गाव निवडा : ॲपमध्ये आपले राज्य, जिल्हा, तालुका (ब्लॉक पंचायत) आणि गाव (व्हिलेज पंचायत) निवडा.
- आर्थिक वर्ष निवडा : यानंतर तुमच्या गावाच्या कोडसह आर्थिक वर्षाची यादी दिसते. तुम्हाला ज्या वर्षाची माहिती हवी असेल, त्यावर क्लिक करा.
- तपशील मिळवा
- ER डिटेल्स : निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती.
- Approved Activities : मंजूर कामे आणि त्यासाठीच्या निधीचा तपशील.
- Financial Progress : गावाच्या आर्थिक प्रगतीची माहिती.
- Receipts : ग्रामपंचायतीला मिळालेला निधी.
- Expenditure : निधी कशा पद्धतीने खर्च झाला.
सरपंचाची जबाबदारी
ग्रामपंचायतीला मंजूर झालेला निधी जर वेळेत खर्च झाला नाही, तर तो पुन्हा सरकारला परत जातो. त्यामुळे निधी परत जाणे म्हणजे सरपंच आणि ग्रामपंचायतीची कार्यक्षमता कमी असल्याचे सूचित करते.
नागरिकांची जबाबदारी
ग्रामपंचायतीच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, निधीचा वापर योग्य प्रकारे होतोय का हे तपासणे, आणि गरज पडल्यास याबाबत माहिती मागवणे, हे जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे. ‘ई-ग्रामस्वराज्य’ सारखी साधने यासाठी प्रभावी ठरतात.
गावाचा विकास नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय अपूर्णच राहील. त्यामुळे आपल्या गावाच्या प्रगतीसाठी आपणही सजग होऊया!